पाटणा - बिहार विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आल्याने सध्या राजकीय वातावरण हळुहळू तापू लागले आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र आज पाच आमदारांनी राष्ट्रीय जनता दलाला सोडचिठ्ठी दिल्याने तसेच उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने लालूंना मोठा धक्का बसला आहे.
राजदच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच ज्येष्ठ नेते आणि राजदचे उपाध्यक्ष रधुवंश प्रसाद सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय प्रसाद, कमरे आलम, राधाचरण सेठ, रणविजय सिंह आणि दिलीप राय या पाच आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, हे पाचही नेते आता जेडीयूमध्ये प्रवेश करणार आहेत.
राजीनामा देणारे सर्व आमदार हे लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय जनता दलामध्ये सध्या सुरू असलेली घराणेशाही आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामुळे हे नेते त्रस्त असल्याचे वृत्त आहे.
बिहार विधानसभा निव़डणुकीपूर्वी बिहारच्या विधान परिषदेच्या ९ जागांसाठी ७ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आरजेडीकडून तेजप्रताप यादव यांना उमेदवार बनवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्याच्या सदस्यसंख्येनुसार आरजेडीला नऊपैकी तीन जागांवर विजय मिळू शकतो. अशा परिस्थितीत तेजप्रताप यादव यांचा विजय निश्चित आहे. मात्र तेजप्रताप यादव यांना विधान परिषदेत पाठवण्याबाबत अनेक नेते नाराज आहेत. या नाराज नेत्यांमध्ये विधान परिषदेतील या पाच आमदारांचाही समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या