पाटणा: बिहारच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बिहारमध्ये खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM पक्षाला मोठे भगदाड पडले आहे. बिहारमधील AIMIM च्या पाचपैकी चार आमदारांनी RJD मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. खुद्द बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या प्रवेशाला दुजोरा दिला आहे.
आज(बुधवार) अचानक तेजस्वी यादव बिहार विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा यांच्या दालनात पोहोचले आणि तिथे एआयएमआयएमच्या 4 आमदारांची भेट घेतली. यावेळी अख्तरुल इमान वगळता ओवेसी यांच्या पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. आरजेडीमध्ये सामील होणाऱ्या आमदारांमध्ये कोचाधामनचे आमदार मोहम्मद इझार अस्फी, जोकीहाटचे आमदार शहनाबाज आलम, बयासीचे आमदार रुकनुद्दीन अहमद, बहादूरगंजचे आमदार अन्जार नईमी यांचा समावेश आहे.
ओवेसींच्या पक्षाचे चार आमदार सामील झाल्याने भाजपला मागे टाकून आरजेडी बिहारमधील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. एआयएमआयएमच्या आमदारांसह आता विधानसभेत राजदचे 79 आमदार असतील, तर 77 आमदारांसह भाजप दुसरा पक्ष असेल. यावर अद्याप असदुद्दीन ओवेसी यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ते यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचा असेल.