भाजप शासित उत्तराखंडमध्ये बाबा रामदेवांना मोठा झटका, 'या' 5 औषधांचे उत्पादन रोखले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 05:07 PM2022-11-10T17:07:08+5:302022-11-10T17:08:32+5:30
केरळमधील एक डॉक्टर केव्ही बाबू यांनी जुलै महिन्यात, पतंजलीच्या दिव्य फार्मेसीने ड्रग्स अॅण्ड मॅजिक रेमिडीज (ऑब्जेक्शनेबल अॅडव्हर्टाइजमेन्ट) अॅक्ट 1954, ड्रग्स अॅण्ड कॉस्मेटिक अॅक्ट 1940 आणि ड्रग्स अॅण्ड कॉस्मेटिक रूल्स 1945 चे वारंवार उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा हवाला देत आयुर्वेद आणि युनानी लायसन्स अथॉरिटी, उत्तराखंडने पतंजलीची उत्पादने तयार करणाऱ्या दिव्य फार्मसीला 5 औषधांची उत्पादने रोखण्याचे निर्देश दिले आहेत. ब्लड प्रेशर, डायबेटीज, गॉइटर (गलगंड), ग्लूकोमा आणि हाय कोलेस्टेरॉलवरील उपचारासाठी ही औषधे वापरली जातात. बीपीग्रिट, मधुग्रिट, थायरोग्रिट, लिपिडोम आणि आयग्रिट गोल्ड, अशी या औषधांची नावे आहेत.
केरळमधील एक डॉक्टर केव्ही बाबू यांनी जुलै महिन्यात, पतंजलीच्या दिव्य फार्मेसीने ड्रग्स अॅण्ड मॅजिक रेमिडीज (ऑब्जेक्शनेबल अॅडव्हर्टाइजमेन्ट) अॅक्ट 1954, ड्रग्स अॅण्ड कॉस्मेटिक अॅक्ट 1940 आणि ड्रग्स अॅण्ड कॉस्मेटिक रूल्स 1945 चे वारंवार उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. बाबू यांनी राज्याच्या लायसन्सिंग अथॉरिटीकडे (एसएलए) 11 ऑक्टोबरलाला पुन्हा एकदा ईमेलद्वारे तक्रार केली होती.
यानंतर, अथॉरिटीने पतंजलीला फॉर्मुलेशन शीट आणि लेबलमध्ये बदल करून सर्व 5 औषधांसाठी पुन्हा एकदा मंजूरी घेण्यास सांगितले आहे. तसेच, कंपनीने ही मंजूरी घेतल्यानंतरच पुन्हा एकदा उत्पादन सुरू करू शकते, असे आदेशात म्हणण्यात आले आहे. दिव्य फार्मेसीला पाठवण्यात आलेल्या पत्रात जॉइंट डायरेक्टर आणि ड्रग कंट्रोलर डॉ. जीसीएन जंगपांगी यांनी कंपनीला मीडिया स्पेसवरून 'दिशाभूल आणि आक्षेपार्ह जाहिराती हटविण्यास सांगितले आहे. याच बरोबर, भविष्यात केवळ मान्यताप्राप्त जाहिराती चालवण्याचा सल्ला देत उत्पादन परवाना काढून घेण्याचा इशाराही दिला आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात अथॉरिटीने कंपनीकडून एका आठवड्यात उत्तरही मागितले आहे.
याच बरोबर, स्टेट अथॉरिटीने जिल्हा आयुर्वेदिक आणि यूनानी ऑफिसरला कंपनीला व्हिजिट करून एका आठवड्यात सविस्तर अहवालही देण्यास सागितले आहे. यासंदर्भात बोलताना, स्टेट लायसन्सिंग अथॉरिटीकडून आपल्याला अद्याप असे कुठलेही पत्र आलेले नाही. असे झाल्यानंतरच काही बोलता येईल, असे पतंजलीचे प्रवक्ता एसके तिजारावाला यांनी म्हटले आहे. तसेच, ''आम्ही केवळ मीडियामध्ये लेटरसंदर्भात वाचले आहे. मात्र, कसल्याही प्रकारची पुष्टी नाही. आम्हाला ते मिळालेले नाही,'' असेही त्यांनी एका माध्यमाशी बोलताना म्हटले आहे.