गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमधील एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारवर तसेच केंद्र सरकारवर हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने चौफेर टीका होत आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील सरकारमधील एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या कुकी पीपल्स अलायन्सने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. आज संध्याकाळी पाठिंबा काढण्याचा निर्णय घेऊन पक्षाने याची घोषणा केली आहे. मणिपूरमध्ये गेल्या मे महिन्यापासून तणावाचं वातावरण सुरू आहे. राज्यामध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि तीन महिन्यांनंतरही परिस्थिती सामान्य होत नसल्याने पक्षाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारमध्ये कुकी पीपल्स अलायन्सच्या दोन आमदारांचा समावेश होता.
४ मे २०२३ रोजी मणिपूरमध्ये मैतेई समुदायाला आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान भडकलेली हिंसा अद्याप थांबलेली नाही. तेव्हापासून मणिपूर हिंसेच्या आगीत होरपळत आहे. आजही राज्यातील काही भागात जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.
गेल्या महिन्यात महिलांवर अत्याचार करून त्यांची विवस्र धिंड काढल्याचा मणिपूरमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. संसदेतही विरोधी पक्षांनी हा विषय आक्रमकपणे मांडला होता. हा व्हिडीओ ४ मे रोजीचा होता. तो १९ जुलै रोजी समोर आला होता. त्यानंतर आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती.