आगरताळा - पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पूर्वोत्तर राज्यांमधील त्रिपुरामध्येभाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुदीप रॉय बर्मन आणि त्यांचे निकटवर्तीय आशिष कुमार साहा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते आता दिल्लीला रवाना होणार असून, त्यांचे पुढचे राजकीय पाऊल काय असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सुदीप राय बर्मन हे गेल्या काही काळापासून नाराज होते. गेल्या आठवड्यात त्यांनी त्रिपुरामध्ये सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारवर टीका केली होती. राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची लोकशाही राहिलेली नाही. येथे लोकांची घुसमट होत आहे, असा आरोप केला होता. बर्मन यांना २०१९ मध्ये मंत्रिपदावरून हटवण्यात आले होते. दरम्यान, लोकांशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
२०१८ मध्ये डाव्या पक्षांची वर्षांनुवर्षांची सत्ता उलथवून भाजपाने त्रिपुरामध्ये बहुमत मिळवले होते. त्रिपुरामध्ये २०२३ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र तत्पूर्वी बड्या नेत्याने पक्ष सोडल्याने भाजपाला धक्का बसला आहे.