बंगळुरू - भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना चक्क एका भाजप आमदाराने पदाचा राजीनामा देत काँग्रेससोबत हातमिळवणी केलीय. कर्नाटकमधील लिंगायत समजाचा मोठा चेहरा असलेल्या पुतन्ना यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आता, ते बंगळुरू शहरातून आमदारकीची निवडणूक लढवणार आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांना त्यांना विरोध केला आहे. बंगळुरु येथेून तिकीट न देण्याची मागणी काँग्रेस नेते मनोहर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलीय.
कर्नाटकमध्ये यंदाच्या वर्षीच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वीच, राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून बदलाचे वारे फिरत असताना दिसून येते, एकीकडे काँग्रेसने राज्यात सत्ता काबिज करण्याचा चंग बांधला असताना, आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे विधानपरिषद आमदार पुतन्ना यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माझी अंतरात्मा मला मारून टाकतेय की मी भाजपात प्रवेश केला. पक्षात ज्याप्रमाणे भ्रष्टाचार होतोय, त्याची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळेच, मी भाजपमधून बाहेर पडलो असून राजीनामा दिलाय, असे पुतन्ना यांनी म्हटले.
दरम्यान, कर्नाटकमध्ये यावर्षी मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित मानला जात असून, काँग्रेसला २२४ पैकी १४० जागा मिळण्याची शक्यता आहे, असा दावा काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये करण्यात आला आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे भाजपामधील अनेक विद्यमान आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.