काँग्रेसला मोठा धक्का, आणखी एका दिग्गज युवा नेत्याने दिली पक्षाला सोडचिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 01:12 PM2023-02-23T13:12:49+5:302023-02-23T13:13:28+5:30
Congress: काँग्रेस नेते आणि देशातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी यांचे पणतू सी. आर. केसवन यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेस नेते आणि देशातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी यांचे पणतू सी. आर. केसवन यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना संबोधित करत आपला राजीनामा सोशल मीडियावरून शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पक्ष सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
केसवन यांनी लिहिले की, मला हे सांगताना दु:ख होते की, गेल्या काही काळापासून मी त्या मूल्यांचे कुठलेही अवशेष पाहिलेले नाहीत, ज्यांनी मला पक्षाप्रति समर्पणासह दोन दशकांपासून अधिक काळापर्यंत काम करण्यासाठी प्रेरित केले. त्यामुळेच मी हल्लीच राष्ट्रीय स्तरावर संघटनात्मक जबाबदारीला नकार दिला होता. तसेच भारत जोडो यात्रेपासून दूर राहिले होते.
सर्वात जुन्या पक्षाला रामराम ठोकताना त्यांनी सांगितले की, ही माझ्यासाठी नवा मार्ग निवडण्याची वेळ आहे. त्यामुळे मी तत्काळ प्रभावाने काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी कुठल्याही इतर पक्षामध्ये जाईन याबाबत अंदाज व्यक्त केला जाईल. मात्र स्पष्टपणे सांगायचं तर मी कुणाबरोबरही बोललो नाही आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर पुढे काय करावं लागेल, हे मला माहिती नाही आहे.
केसवन यांनी पत्रामध्ये लिहिले की, सरकार आणि संघटनेने अनेक वर्षांपूर्वी मला सोपवलेल्या जबाबदाऱ्यांसाठी पक्ष आणि श्रीमती सोनिया गांधी यांचे आभार मानतो. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सर्जिकस स्ट्राइकचे पुरावे मागितले. ही बाब खूप निराशाजनक आहे. मला वाटते की, माझी काम करण्याची पद्धत ही पक्षाशी अनुरूप अशी नाही आहे. त्यामुळेच मी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालो नाही. मला वाटते की आता माझं या पक्षात काही काम राहिलेलं नाही आहे.