Ghulam Nabi Azad quits Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेस पक्षातील आपल्या सर्व पक्षीय पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. ते दीर्घकाळापासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले नसल्याने त्यांची नाराजी अधिकच वाढल्याचे सांगितले जात होते. काही दिवसांपूर्वी आझाद यांनी काश्मीरमधील पक्षाच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधींना उद्देशून लिहिलेल्या आपल्या पत्रात आझाद यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला
गुलाम नबी आझाद हे पक्षावर बराच काळ नाराज होते. काँग्रेसच्या G-23 बंडखोर गटाचे महत्त्वाचे सदस्य आझाद यांनी काँग्रेसमधील बदलांबाबत सोनिया गांधींना पत्रही लिहिले होते. या पत्रानंतर बराच गदारोळ झाला होता. आझाद यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले की, त्यांच्या विद्यार्थी जीवनात त्यांच्यावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सुभाष चंद्र बोस आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांचा प्रभाव होता. १९७५-७६ मध्ये संजय गांधींच्या विनंतीवरून त्यांनी जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता अनेक दशके पक्षाची सेवा केली.