काँग्रेसला मोठा धक्का?; माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भाजपात प्रवेश करण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 04:20 PM2022-04-06T16:20:11+5:302022-04-06T16:20:42+5:30
दिगंबर कामत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही लागले होते. २००७ ते २०१२ या कालावधीत ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा न्या. एमबी शाह आयोगाने त्यांच्यावर ३५ हजार कोटी खाण घोटाळ्याचा आरोप लावला होता
पणजी – गोव्यात काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते दिगंबर कामत हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात असं सांगितले जात आहे. त्यांना ऊर्जामंत्री बनवलं जाऊ शकते. दिगंबर कामत हे काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर ते भाजपात ११ वर्ष होते. पुन्हा स्वगृही परतत असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केले. दिगंबर कामत(Digambar Kamat) हे राज्याचे मुख्यमंत्रीही होते. २०२२ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयी करण्याची जबाबदारी कामत यांच्यावर होती. परंतु काँग्रेसला गोव्यात पराभवाचा सामना करावा लागला.
५ राज्यात झालेल्या पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गोव्याचे काँग्रेस नेते दिगंबर कामत भाजपात(BJP) प्रवेश करतील आणि त्यांना सरकारमध्ये ऊर्जा खात्याची जबाबदारी देण्यात येऊ शकते असं बोललं जात आहे. गोव्यात जवळपास १० वर्ष काँग्रेस सत्तेच्या बाहेर आहे. या काळात कामत ३ वर्ष विरोधी पक्षनेते होते. कामत हे गोव्यातील काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळखले जातात. २००५ मध्ये ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. २००७ मध्ये ते गोव्याचे मुख्यमंत्री बनले होते.
दिगंबर कामत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही लागले होते. २००७ ते २०१२ या कालावधीत ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा न्या. एमबी शाह आयोगाने त्यांच्यावर ३५ हजार कोटी खाण घोटाळ्याचा आरोप लावला होता. २०१४ मध्ये त्यांची यासंदर्भात चौकशीही करण्यात आली होती. १० मार्च रोजी लागलेल्या निकालात भाजपला २० जागा मिळाल्या होत्या. बहुमताच्या आकड्यापासून भाजपा फक्त एक जागा दूर होती. सध्या भाजपाने एमजीपी आणि तीन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे. निवडणुकीत ४० सदस्यीय विधानसभेत काँग्रेसला ११ जागा मिळाल्या. पराभवानंतर मार्चअखेर काँग्रेसने गोव्यात अमित पाटकर यांची नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तर दिगंबर कामत यांचा काँग्रेस कार्यकारिणीत समावेश करण्यात आला होता.
त्याचसोबत काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी मायकल लोबो यांची निवड करण्यात आली. याच निवडीवरून दिगंबर कामत दुखावले गेले. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विश्वासात न घेता निर्णय घेतल्याने कामत नाराज झाले. कामत यांना डावलल्याने समर्थकांमध्येही नाराजी पसरली. वेळेप्रसंगी आमदारकीचाही राजीनामा द्या असं समर्थक म्हणाले. मात्र गोव्यातील या राजकीय हालचालीमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.