छत्तीसगडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. इथे सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये मुख्य लढत असेल. दरम्यान, निवडणुकीला काही महिने राहिले असताना दोन्ही पक्षांनी आपापली बाजू अधिकाधिक भक्कम करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असून, राज्यातील काही प्रमुख चेहऱ्यांना भाजपाने आपल्या पक्षात सामावून घेतले आहे. यामध्ये सतनामी संप्रदायाचे आध्यात्मिक गुरू बालदास साहब यांचाही समावेश आहे. त्यांनी त्यांचे दोन मुलगे आणि मुलीचाही भाजपामध्ये पक्ष प्रवेश करवून घेतला आहे. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. गुरू बालदास यांची अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये बऱ्यापैकी पकड असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीमध्ये ऐन निवडणुकीपूर्वी आध्यात्मिक गुरूंनी पक्ष बदलल्याने काँग्रेससमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच राजकीय समिकरणेही बदलण्याची चिन्हे आहेत.
छत्तीसगडमध्ये गुरू बालदास यांनी निवडणुकीतील गेम चेंजर म्हणून ओळखळे जाते. ते सतनामी समाजातील एक मोठा अध्यात्मिक चेहरा आहेत. त्यांनी आतापर्यंत ज्या पक्षासाठी प्रचाराची जबाबदारी उचलली आहे, तो पक्ष संपूर्ण बहुमतासह सत्तेत येतो, असं सांगितलं जातं. त्यांनी २०१३ मध्ये भाजपाचा प्रचार केला होता, तर २०१८ मध्ये काँग्रेसमध्ये सामील होत काँग्रेसला सतनामी समाजाचा पाठिंबा मिळवून दिला होता.
२०१३ मध्ये छत्तीसगडमध्ये भाजपाची सत्ता येण्यामागे गुरू बालदास यांची मेहनत असल्याचे सांगण्यात येते. मात्र २०१८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपावर नाराज होत. काँग्रेसमध्ये दाखल झाला होते. मात्र आथा २०२३ मध्ये निवडणुकीला तीन महिने असतानाच त्यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गुरू बालदास यांनी त्यांचे दोन्ही मुलगे खुशवंत साहब आणि सौरभ साहब यांच्यासह मुलगीलाही भाजपामध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.
गुरू बालदास यांचा मोठा मुलगा खुशवंत साहब यांनी रायपूरमधील आरंग विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावेदारीही केली आहे. आता जर सर्व्हेच्या रिपोर्टमध्ये सकारात्मक परिणाम समोर आला तर खुशवंत साहब यांना उमेदवारी मिळणं निश्चित आहे.