काँग्रेसला मोठा झटका! गुलाम नबी आझाद यांच्या पुतण्याचा भाजपमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 07:15 PM2022-02-27T19:15:42+5:302022-02-27T19:16:03+5:30
मुबशीर आझाद आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपचे जम्मू-काश्मीर युनिटचे अध्यक्ष रविंदर रैना यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
नवी दिल्ली: काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे पुतणे मुबशीर आझाद यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गुलाम नबी आझाद यांचे धाकटे भाऊ लियाकत अली यांचा मुलगा मुबशीर यांनी पक्ष सोडताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने माझे काका आझाद यांचा नेहमी अपमान केला असं ते म्हणाले.
मुबशीर यांनी यावेळी नरेंद्र मोदींचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांमुळे मी प्रभावित झालो आहे, असंही ते म्हणाले. तसेच, त्यांनी या भाजप प्रवेशापूर्वी आपल्या काकांशी चर्चा केली नसल्याची माहिती दिली. मुबशीर आझाद आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या जम्मू आणि काश्मीर युनिटचे अध्यक्ष रविंदर रैना आणि माजी आमदार दलीप सिंग परिहार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
Heartiest Congratulations to Mr.#Mubashar_Azad Sahib on Joining @BJP4JnK . pic.twitter.com/1IH9Evsvzj
— Ravinder Raina (@ImRavinderRaina) February 27, 2022
काँग्रेसने काकांचा अपमान केला
एप्रिल 2009 मध्ये आझाद यांचे भाऊ गुलाम अली यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुबशीर आझाद म्हणाले, "काँग्रेस पक्ष आपापसात भांडण करण्यात गुंतला आहे. काँग्रेसने माजे काका माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा नेहमी अपमान केला. ते काँग्रेसचे एक करिष्माई नेते आहेत, पण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागले त्यामुळे सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्या आहेत.'' गुलाम नबी आझाद असंतुष्ट काँग्रेस नेत्यांच्या गटात होते, ज्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनात्मक सुधारणांची मागणी केली होती.
अनेकजण भाजपात सामील होतील
यावेळी रविंदर रैना यांनी मुबशीर यांच्या निर्णयाला टर्निंग पॉइंट असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, मुबशीर यांच्या या निर्णयामुळे चिनाब खोऱ्यातील डोडा, किश्तवाड आणि रामबन जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांना पक्षात सामील होण्याचा मार्ग मोकळा होईळ. भाजप विरोधी पक्षांमधील राजकीय नेते, हिंदू, मुस्लिम, गुर्जर, बकरवाल आणि पहारी अशा सर्व समाजातील सामाजिक कार्यकर्ते आणून वेगाने पुढे जात आहे."