हरियाणामध्ये महाराष्ट्र विधानसभेसोबतच निवडणूक लागणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेसला तिथे धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. मुलीला लोकसभेचे तिकीट नाकारले म्हणून नाराज असलेल्या महिला आमदाराने काँग्रेसवर पक्ष ही वैयक्तिक मालमत्ता झाली आहे, अशी टीका करत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या किरण चौधरी आणि त्यांची मुलगी श्रृती चौधरी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. बुधवारी दोघीही भाजपात प्रवेश करणार आहेत. श्रृती चौधरी या माजी खासदार व हरियाणा काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा आहेत. तर किरण चौधरी या आमदार आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे चौधरींनी राजीनामा पाठविला आहे. हरियाणातील काँग्रेस ही खासगी जहागीर झाली असल्याची टीका चौधरी यांनी केली आहे. माझ्यासारख्या प्रामाणिक आवाजासाठी जागा उरलेली नाही. मला दडपण्यात आले, अपमानित करण्यात आले आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने माझ्याविरुद्ध कट रचण्यात आला. आपल्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि ज्या मूल्यांसाठी मी नेहमीच उभी राहिली होते. ते टिकवून ठेवण्याच्या माझ्या प्रयत्नांना अडथळे आणण्यात आले, असा आरोप त्यांनी राजीनाम्यात केला आहे. चौधरी यांनी ४० वर्षांची काँग्रेसशी असलेले संबंध संपविले आहेत.
किरण चौधरी या हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांची सून आहेत. त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या कट्टर विरोधक मानल्या जातात. लोकसभा निवडणुकीत श्रुती चौधरी यांना भिवानी-महेंद्रगड मतदारसंघातून तिकीट न दिल्याने त्या नाराज होत्या. काँग्रेसने या जागेवरून विद्यमान आमदार आणि हुडा यांचे खास राव दान सिंह यांना तिकीट दिले होते. भाजपचे विद्यमान खासदार धरमबीर सिंह यांच्याकडून रावदान यांना पराभव पत्करावा लागला आहे.