नवी दिल्ली - सध्या नेतृत्वाच्य संकटाचा सामना करत असलेल्या अजून एक मोठा धक्का बसला आहे. जम्मू-काश्मीरमधीलकाँग्रेसचे बडे नेते आणि महाराजा कर्ण सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. आज त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. विक्रमादित्य सिंह यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचे विचार हे पक्षासोबत जुळत नाहीत. तसेच त्यांनी पक्षावर जमिनीवरील वास्तवापासून अनभिज्ञ असल्याचाही आरोप केला आहे.
राजीनाम्याबाबत माहिती देताना विक्रमादित्य सिंह यांनी ट्विट करत लिहिले की, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा राजीनामा देत आहे. जम्मू-काश्मीरबाबतच्या महत्त्वाच्या मुद्यांवर राष्ट्रीय हिताशी मिळतेजुळते असलेले माझे विचार हे काँग्रेस पक्षासोबत जुळत नाहीत. काँग्रेस पक्ष जमिनीवरील वास्तवापासून दूर गेला आहे.
विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्य पत्रात सांगितले की, माझ्या मते काँग्रेस पक्ष हा जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या भावना, आणि आकांक्षा जाणून घेण्यास असमर्थ आहे.
विक्रमादित्य सिंह हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. कर्ण सिंह यांचे पुत्र आहेत. विक्रमादित्य सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथून २०१९ मध्ये लोकसहा निवडणूक लढवली होती. त्यांना २०१५ मध्ये जम्मू-काश्मीर विधान परिषदेचे सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले होते. २०१५ मध्ये ते पीडीपीमध्ये सामील झाले होते. मात्र २०१७ मध्ये त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.