Rahul Gandhi, Amit Shah: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना शुक्रवारी मोठा धक्का बसला. मानहानीच्या खटल्यातील त्यांची याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली. गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्याशी संबंधित हे प्रकरण आहे. कनिष्ठ न्यायालयाने बजावलेल्या समन्सविरोधात राहुल गांधीउच्च न्यायालयात अपील केले होते. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने ती फेटाळून लावली.
गेल्या महिन्यात झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी करताना खालच्या न्यायालयाचे रेकॉर्ड मागवले होते. याचिकेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात गांधींच्या कथित अपमानास्पद टिप्पणीवर भाजप कार्यकर्त्याने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात रांची जिल्हा न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. पण हायकोर्टाने राहुल यांचीच याचिका फेटाळून लावली.
भाजपा नेते नवीन झा यांनी २८ एप्रिल २०१८ रोजी राहुल गांधींविरोधात रांची कोर्टात तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला होता की १८ मार्च २०१८ रोजी काँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी भाजपाविरोधात भाषण केले होते आणि शाह यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. गांधी यांनी दिलेले वक्तव्य खोटेच नाही तर भारतीय जनता पक्षासाठी नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, समर्थकांचा आणि नेत्यांचा अपमान आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
यानंतर रांची मॅजिस्ट्रेट कोर्टाने झा यांची तक्रार फेटाळली होती. यानंतर त्यांनी रांचीच्या न्यायिक आयुक्तांसमोर फौजदारी पुननिरीक्षण याचिका दाखल केली. रांची न्यायिक आयुक्तांनी १५ सप्टेंबर २०१८ रोजी पुनर्विचार याचिकेला परवानगी दिली. यानंतर मॅजिस्ट्रेटला रेकॉर्डवरील पुरावे पुन्हा तपासण्याचे आणि नवीन आदेश देण्याचे निर्देश देण्यात आले. परिणामी, दंडाधिकाऱ्यांनी दखल घेत २८ नोव्हेंबर रोजी समन्स जारी केले. १६ मे २०२३ रोजी न्यायमूर्ती अंबुज नाथ यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांनी याचिकाकर्त्याला या प्रकरणात पीडित मानले जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला होता.