उद्योगपती गौतम अदानींच्या कंपनीकडून संचालन होणाऱ्या मुंद्रा पोर्टवरून जप्त करण्यात आलेल्या ३ हजार किलोग्रॅम हेरॉईनबाबत एनआयएच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ड्रग्सचा वापर लष्कर ए तोयबाला फंडिंगसाठी करण्यात येत होता. त्यामधून देशामध्ये दहशतवादी कारवाया करण्यात येणार होत्या. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) ने आपल्या पुरवणी आरोपपत्रामधून याबाबतची माहिती दिली आहे. हे हेरॉईन दिल्लीपर्यंत पोहोचले असते तर ते विकून मिळणाऱ्या पैशांमधून लष्कर ए तोयबाला फंडिंग करण्याची योजना आखण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेपलिकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांनी भारतामध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांना फंडिंग करण्यासाठी ड्रग्सचा मार्ग शोधला आहे. मुंद्रा पोर्टवर जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सचा वापर हा लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटनेसाठी होणार होता. तपास यंत्रणेने पुरवणी आरोपपत्रामध्ये एकूण २२ लोकांसह पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि दुबईमधील आरोपींशी संबंधित कंपन्यांनाही आरोप बनवण्यात आले आहे.
२०२१ मध्ये इराणमार्गे अफगाणिस्तानमधून मुंद्रा पोर्टवर आलेल्या जहाजामधून तब्बल ३ हजार किलो ड्रग्स जप्त करण्यात आले होते. एनआयएने या प्रकरणी गेल्या वर्षी दिल्लीमध्ये नाईट क्लबमधील एका मालकाला अटक केले होते. तो भारतामध्ये हेरॉईनच्या तस्करीसाठी कमर्शियल ट्रेड रूटचा वापर करत होता.
२२ आरोपींविरुद्ध सप्लिमेंट्री चार्जशिटमध्ये एनआयएने हरप्रीत सिंह तलवार उर्फ कबीरला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. तलवार याने अनेकदा दुबईचा दौरा केला आणि व्यावसायिक प्रमाणावर भारतामध्ये ड्रग्सची तस्करी करण्यासाठी सागरी मार्गाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. कबीर तलवार याला गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आले होते.