शरद गुप्ता -नवी दिल्ली - सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यात शुक्रवारी जागां वाटपासंदर्भात सपा कार्यालयात बैठक झाली. मात्र, या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. कारण आझाद त्यांच्या उमेदवारांसाठी पश्चिम यूपीमध्ये 10 जागा मागत होते, अखिलेश यासाठी राजी झाले नाही.
खरे तर, एकापाठोपाठ एक मंत्री आणि आमदार भाजपची साथ सोडून सपामध्ये जात आहेत. यामुळे अखिलेश यादव यांचीच अडचण अधिक वाढल्याचे दिसते. यापूर्वीच 6 पक्षांशी हातमिळवणी केलेल्या सपाला आपल्या कार्यकर्त्यांना नाराज न करता बाहेरून आलेल्या नेत्यांना जागा देणे सोपे दिसत नाही. कारण सर्वांना जागा वाटून ३२५ जागांवर उमेदवार उतरवण्याची अखिलेश यांची इच्छा आहे. सपाने ओमप्रकाश राजभर यांच्या सुभाएसपीसोबत, संजय चौहान यांच्या डेमोक्रॅटिक पार्टीसोबत, अपना दलसोबत (कृष्णा पटेल गट), केशवदेव मौर्य यांच्या महान दलसोबत, जयंत चौधरी यांच्या रालोदसोबत आणि शिवपाल यादव यांच्याशी आघाडी केली आहे.
नवे नेते सपात सामील झाल्याने, अखिलेश यांना जुन्या सहकाऱ्यांसोबतच्या जागावाटपाचा पुनर्विचार करावा लागत आहे. यामुळेच, पहिल्या टप्प्यासाठी 58 जागांवर उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले असतानाही, सपाला त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करता आलेली नाही. आता स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान, धरमसिंग सैनी यांसारखे बलाढ्य नेते सपामध्ये दाखल झाले आहेत. त्यांना हव्या त्या जागा देणे अखिलेश यांच्यासाठी अवघड काम ठरत आहे. धरमसिंह सैनी यांनी गेल्या निवडणुकीत सहारनपूर जिल्ह्यातील नकुड मतदारसंघातून काँग्रेसच्या इम्रान मसूद यांचा पराभव केला होता. आता हे दोघेही सपामध्ये सामील झाले आहेत.
रालोदची अडचण वाढली - पश्चिम उत्तर प्रदेशातील 40 जागांवर उमेदवार उतरविण्यासंदर्भात सपा आणि रालोद यांच्यात सहमती झाली होती. यांपैकी 10 जागांवर सपाचे उमेदवार रालोदच्या चिह्नावर लढणार होते. तर जारी करण्यात आलेल्या यादीत 19 रालोद आणि 10 सपाचे उमेदवार होते. रालोदच्या उमेदवारांतही 2 सपाचेच नेते होते.
कुशवाहा-राजभर -कधीकाळी मायावतींचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे बाबूसिंग कुशवाह यांचीही सपा आघाडीत सामील होण्याची इच्छा आहे. पण त्यांची पत्नी शिवकन्याच्या जागेसंदर्भात अद्याप ओमप्रकाश राजभर यांच्याशी सहमती होऊ शकलेली नाही.