पुढील १५ दिवसांत काँग्रेस पक्षसंघटनेत होणार मोठा बदल?; मल्लिकार्जुन खरगेंनी तयार केली यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 07:12 PM2023-06-14T19:12:48+5:302023-06-14T19:13:31+5:30
२०२४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी स्वत:चं राजकीय अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे. त्यामुळे काँग्रेस कोणत्याही प्रकारची राजकीय जोखीम घेऊ इच्छित नाही
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका आता ११ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने सत्तेची रणनीती आणि पक्षीय संघटना मजबूत करण्याकडे भर दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे २०२४ निवडणुकीपूर्वी संघटनेत मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्यात निम्म्याहून अधिक राज्यातील प्रदेशाध्यक्षांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्याशिवाय काँग्रेस कार्यकारणी समितीतही बदल होणार आहे. अनेकांच्या खांद्यावर २०२४ ची जबाबदारी देण्यात येणार आहे.
२०२४ ची निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची का?
२०२४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी स्वत:चं राजकीय अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे. त्यामुळे काँग्रेस कोणत्याही प्रकारची राजकीय जोखीम घेऊ इच्छित नाही. काँग्रेस गेल्या ९ वर्षांपासून केंद्रातील सत्तेबाहेर असून देशातील केवळ चार राज्यांत स्वबळावर सत्तेत आहे, तर तीन राज्यांत त्यांचा मित्रपक्ष म्हणून समावेश आहे. अशा स्थितीत काँग्रेस तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत हरली आणि सत्तेत परत येऊ शकली नाही, तर त्यांचा राजकीय पाया टिकवणे कठीण होईल. त्यामुळे २०२३ मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
काँग्रेस संघटनेतील बदलाची रूपरेषा तयार
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत, जेणेकरून २०२४ च्या निवडणुकीच्या रणधुमाळीत नव्या शैलीने आणि आक्रमकपणे उतरता यावे.काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातील फेरबदलाची अंतिम यादी तयार केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर, खरगे त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर नवी यादी जाहीर करतील. ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष ते राज्य प्रभारी आणि CWC सदस्यांची नावे असतील.
यूपी ते महाराष्ट्रापर्यंत प्रदेशाध्यक्षांना डच्चू
मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना डच्चू देण्याची तयारी केली आहे. याठिकाणी त्यांच्या जागी नवीन चेहरे पुढे आणण्याची रणनीती आहे. प्रदेशाध्यक्षपदी यूपीचे ब्रिजलाल खाबरी, दिल्लीचे अनिल चौधरी, छत्तीसगडचे मोहन करकम, पश्चिम बंगालचे अधीर रंजन चौधरी, राजस्थानचे गोविंद सिंग दोतासरा, महाराष्ट्राचे नाना पटोले, झारखंडचे राजेश ठाकूर, अरुणाचलचे नबाम तुकी, केरळचे सुराकरण हे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना डच्चू मिळू शकतो. त्यांच्या जागी काँग्रेसने नव्या चेहऱ्यांकडे कमान सोपवण्याची तयारी केली आहे.
यूपीमध्ये काँग्रेस अजय राय, महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांसारख्या बड्या चेहऱ्यांवर जबाबदारी सोपवू शकतात. याशिवाय बंगालमध्ये काँग्रेस अधीर रंजन चौधरी यांच्या हातून पद काढून घेत ममता यांच्याशी समन्वय साधण्याची रणनीती आहे. ममता बॅनर्जींसोबत अधीर रंजनचा छत्तीस आकडा आहे. २०२४ मध्ये विरोधी पक्षांची एकजूट आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबत समतोल साधण्यासाठी काँग्रेस अधीर रंजन यांच्या जागी नवीन चेहऱ्याला संधी देणार आहेत.