नवी दिल्ली : दिल्लीविमानतळावर प्रवाशांची वाढती गर्दी पाहता विमान कंपन्यांनी नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. इंडिगो एअरलाइननंतर आता एअर इंडियानेही प्रवाशांना देशांतर्गत फ्लाइटसाठी निर्धारित वेळेच्या साडे तीन तास आधी दिल्ली विमानतळावर पोहोचण्यास सांगितले आहे. प्रचंड गर्दी झाल्यानंतर विमान वाहतूक मंत्रालयाने कडकपणा दाखवल्यानंतर विमान कंपन्यांनी हा बदल केला आहे. याचबरोबर, एअरलाइन्स विस्ताराने प्रवाशांना फ्लाइटच्या 3 तास आधी पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.
दिल्लीविमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) मंगळवारी विमान कंपन्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये चेक-इन आणि बॅगेज ड्रॉप काउंटरवर कर्मचाऱ्यांच्या तैनातीपासून फ्लाइट पकडण्याच्या वेळेपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, संसदीय समितीने डीआयएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याशी गर्दीमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल चर्चा केली होती. गर्दीमुळे प्रवाशांना दिल्ली विमानतळावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती. यासंदर्भात 15 डिसेंबरलाही बैठक होणार आहे.
याआधी मंगळवारी, देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने प्रवाशांना देशांतर्गत फ्लाइटसाठी निर्धारित वेळेच्या साडे तीन तास आधी दिल्ली विमानतळावर पोहोचण्यास सांगितले होते. राष्ट्रीय राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGIA) अलिकडच्या आठवड्यांमध्ये वाढत्या हवाई वाहतूक दरम्यान लांब रांगा आणि गर्दी दिसून येत आहे. पीक अवर्समध्ये फ्लाइट्सची संख्या कमी करण्यासह परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अधिकाऱ्यांनी कृती आराखडा तयार केला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही सोमवारी येथील विमानतळावरील व्यवस्थेची पाहणी केली.
गर्दीच्या वेळी, एअरलाइन्स विस्तारा आपल्या प्रवाशांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सच्या किमान तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्यास सांगत आहे. इंडिगोने ट्विट केलेल्या सल्ल्यानुसार, दिल्ली विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे आणि चेक-इन आणि बोर्डिंगच्या वेळा नेहमीपेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. यामध्ये प्रवाशांना देशांतर्गत फ्लाइटसाठी किमान साडे तीन तास अगोदर विमानतळावर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इंडिगोने सांगितले की, "सुरक्षा तपासणीसाठी फक्त सात किलो वजनाच्या एका हाताच्या सामानाची विनंती केली आहे. याशिवाय, प्रवाशांना त्यांचे वेब चेक-इन पूर्ण करण्यास सांगितले आहे."
याचबरोबर, विमानतळ टर्मिनल्सवर प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा हवाला देत, स्पाईसजेटने प्रवाशांना लवकर पोहोचण्याचा आणि सात किलोग्रॅमपर्यंत फक्त एकच कॅरी-ऑन बॅगेज घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली विमानतळाबाबत स्पाईसजेटने सांगितले की, प्रवाशांच्या मोठ्या संख्येमुळे चेक-इन आणि बोर्डिंगला सामान्यपेक्षा जास्त वेळ लागण्याची अपेक्षा आहे. मुंबई विमानतळाच्या संदर्भात, स्पाईसजेटने प्रवाशांना "देशांतर्गत फ्लाइटच्या सुटण्याच्या वेळेपूर्वी अडीज तास आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी साडेतीन तास आधी" पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मंगळवारीही अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर दिल्ली विमानतळावर गोंधळ आणि तासनतास वाट पाहत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.