तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 21 जुलै रोजी भाजपचे दोन खासदार टीएमसीमध्ये सामील होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते गुरुवारी म्हणाले, भाजपच्या दोन खासदारांनी 21 जुलै रोजी होणाऱ्या शहीद दिनाच्या कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी सर्व पैलूंचा विचार करून अंतिम निर्णय घेतील.
घोष यांनी दावा केला आहे की, "नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 12 खासदार निवडून आले असून त्यांपैकी दोन आमच्या संपर्कात आहेत. त्यांनी आमच्याशी संपर्क साधून तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. 21 जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान पक्ष प्रवेश करू शकतात. या खासदारांची ओळख सध्या उघड करता येणार नाही. एवढेच नाही तर, हे खासदार नुकतेच निवडून आले आहेत. यामुळे पक्षांतरविरोधी कायद्याच्या कक्षेत येऊ नये, म्हणून तृणमूल नेतृत्वाने त्यांना काही काळ थांबण्याचा सल्ला दिला असल्याचेही घोष यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना भाजपच्या बंगाल युनिटचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री सुकांता माजुमदार म्हणाले, "कुणाल घोष अनेकदा अशी विधाने करतात ज्यांना गांभीर्याने घेतले जाऊ नाये. चला 21 जुलैपर्यंत प्रतिक्षा करू. यापूर्वीही आपण घोष यांच्या सारख्या नेत्यांचे दावे बघितले आहेत. ते प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची विधानं द्यायला प्रसिद्ध आहे."