सिंहाचे नाव 'सीता' अन् 'अकबर' ठेवल्याने मोठा वाद; आता कोर्टाने दिले नाव बदलण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 09:16 PM2024-02-22T21:16:11+5:302024-02-22T21:17:43+5:30
नर सिंहाचे नाव अकबर आणि मादा सिंहाचे नाव सीता ठेवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
कोलकाता:पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये 'अकबर' नावाच्या नर सिंहाला 'सीता' नावाच्या मादा सिंहासोबत ठेवण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. हे प्रकरण इतके वाढले की, विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) बंगाल युनिटने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि हा हिंदू धर्माचा अपमान असल्याचे म्हटले. न्यायालयाने 16 फेब्रुवारी रोजी दाखल केलेल्या याचिकेवर 20 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. यानुसार, न्यायालयाने सिंहाच्या या जोडीचे नाव बदलण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सिलीगुडीतील सफारी पार्कचे आहे. एका मादा सिंहाला माता सीतेचे आणि तिच्यासोबत राहणाऱ्या नर सिंहाला अकबराचे नाव दिल्यावरुन विश्व हिंदू परिषदेने भावना दुखावल्याचा आरोप केला होता. या सिंहाच्या जोडीला अलीकडेच त्रिपुरातील सेपाहिजाला प्राणी उद्यानातून आणण्यात आले आहे. आता कोर्टाने या सिंहाचे नाव बदलण्याचे आदेश दिले असून, बंगाल सरकारकडून याबाबत उत्तर मागितले आहे.
न्यायमूर्ती सौगता भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगाल सरकारला या सिंहाच्या जोडीचे नाव बदलण्यास सांगितले. कोर्टाने म्हटले की, देशात मोठ्या संख्येने लोक सीतेची पूजा करतात. अकबरदेखील एक कार्यक्षम, यशस्वी आणि धर्मनिरपेक्ष मुघल सम्राट होता. मिस्टर कौन्सिल, तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याचे नाव हिंदू देवाच्या किंवा मुस्लिम पैगंबराच्या नावावर ठेवाल का? मला वाटते, आपल्यापैकी कोणीही अशाप्रकारची नावे ठेवणार नाही. त्यांची नावे सीता आणि अकबर ठेवण्याचा मी निषेध करतो, अशी भूमिका न्यायाधीशांनी मांडली.