PFI वर पुन्हा एकदा मोठी कारवाई; 7 राज्यांतील 200 ठिकाणांवर छापे, 170 जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 09:32 AM2022-09-27T09:32:16+5:302022-09-27T09:37:09+5:30
सरकारला प्रत्युत्तर म्हणून पीएफआयने हिंसक कारवाईचा निर्णय घेतल्याचेही या नोटमध्ये म्हणण्यात आले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, यासाठी पीएफआयने 'बयाथीस' चा मार्ग निवडला आहे. बयाथीस हा एक अरबी शब्द आहे. याचा अर्थ...
सध्या संपूर्ण देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)विरोधात मोठी कारवाई सुरू आहे. यातच मंगळवारी सकाळच्या सुमारास तब्बल 7 राज्यांमध्ये पोलिसांनी छापे टाकले. माध्यमांतील वृत्तांनुसार, या दरम्यान जवळपास 170 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 13 राज्यांत छापे टाकत 100 हून अधिक पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सध्या पोलीस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम, कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात तपास करत आहेत. हिंसक निदर्शनांच्या नियोजनासंदर्भात इनपुट मिळाल्यानंतर छापे टाकण्यात आले. वरिष्ठ गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजेपर्यंत 7 राज्यांत 200 ठिकाणांवर छापे टाकून 170 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी एजन्सिज, भाजप, तसेच आरएसएसच्या नेत्यांना आणि संघटनेला निशाना बनविण्याचा पीएफआयचा प्लॅन होता. असे एका इंटेलिजन्स नोटमधून उघड झाले आहे. या नोटनुसार, आपल्या वरिष्ठ नेत्यांना नवी दिल्लीतील तिहार जेलमध्ये ठेवल्यामुळे पीएफआय कार्यकर्ते नाराज आहेत.
एवढेच नाही, तर सरकारला प्रत्युत्तर म्हणून पीएफआयने हिंसक कारवाईचा निर्णय घेतल्याचेही या नोटमध्ये म्हणण्यात आले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, यासाठी पीएफआयने 'बयाथीस' चा मार्ग निवडला आहे. बयाथीस हा एक अरबी शब्द आहे. याचा अर्थ 'मौत का सौदागर' अथवा 'फिदायीन', असा होतो.