मोठ-मोठ्या मंदिराबाहेर हार आणि फुलांच्या दुकानांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. मंदिरातील प्रथा-परंपरेनुसार तेथे देवासाठी लागणारे श्रीफळ आणि इतर साहित्य या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येते. मंदिराबाहेर असलेल्या या दुकानांसाठी निश्चितच मंदिर समिती प्रशासनाकडून बोली लावण्यात येत असते. त्या बोलीतच जो जास्त दराने बोली लावेल त्यास हे दुकान करारानुसार भाडे तत्त्वावर देण्यात येते. मात्र, एका दुकानासाठी चक्क १.७२ कोटी रुपयांची बोली लागली आहे. त्यामुळे, या दुकानदारासह हे मंदिरही चांगलेच प्रकाशझोतात आले आहे.
मध्य प्रदेशच्या इंदूरमधील हे मंदिर असून येथील दुकान ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन देण्यात येते. इंदूरच्या प्रसिद्ध खजराना गणेश मंदिरात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे या दुकानात फक्त फुले आणि प्रसाद विकता येतो, तरीही या दुकानासाठी १.७२ कोटी रुपयांची बोली लागली आहे. या दुकानाची किमान राखीव किंमत फक्त ३० लाख रुपये होती. दरम्यान, २.४७ लाख रुपये प्रति चौरस फूट असलेले हे दुकान भाडेतत्त्वावर घेण्यासाठी सर्वाधिक बोली लावण्यात आली आहे.
खजराना मंदिर परिसरात ६९.५० चौरस फूट फुले आणि प्रसाद विक्रीचे दुकान ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठी बोली लावण्यात आल्या. हे दुकान घेण्यासाठी एका व्यक्तीने १.७२ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावली. मंदिर व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्याने बुधवारी यासंदर्भात दिली. बोलीची रक्कम ऐकून रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गजही आश्चर्यचकीत झाले आहेत. अलिकडच्या काळात देशातील मंदिर परिसरातील सर्वात महागड्या व्यावसायिक मालमत्ता व्यवहारांपैकी एक म्हणून हे गणले जात आहे.
३० लाख होती बोलीची सुरुवात
या दुकानाची निविदा प्रक्रिया इंदूर विकास प्राधिकरणामार्फत (आयडीए) पार पडली, असे तेथील अधिकाऱ्याने सांगितले. मंदिर व्यवस्थापन समितीच्या अटींनुसार दुकानात फक्त फुले, प्रसाद आणि पूजेचे साहित्य विकता येणार आहे. ते म्हणाले की, हे दुकान भाडेतत्त्वावर देण्यासाठी किमान राखीव किंमत ३० लाख रुपये निश्चित करण्यात आली होती आणि याच्या तुलनेत जवळपास सर्वात जास्त सहापट बोली लावली आहे.