हरियाणा - आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात आणि देशात राजकीय वातावरण तापलं असून अनेक घडामोडी घडत आहेत. हरियाणात भाजपाने मोठी खेळी खेळली असून राज्यातील भाजपा-जननायक जनता पार्टीचे सरकार कोसळलं. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह हरियाणा सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हरियाणात पुन्हा नवीन मंत्रिमंडळ बनवण्यात येणार आहे. कारण, हरियाणात भाजपा आणि जननायक जनता पार्टीची आघाडी तुटल्याचे समजते.
हरियाणामध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अर्जुन मुंडा आणि तरुण चौक निरिक्षक म्हणून सहभागी होतील. काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याची बातमी आली होती. यावेळी लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होणार होती. त्यात जेजीपी भाजपाकडे १ ते २ लोकसभा जागांची मागणी करत होते. याआधीही सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची दुष्यंत चौटाला यांनी भेट घेतली. पण निवडणुकीत आघाडीबाबत काही निर्णय झाला नाही. त्यात, आता हरयाणातील सर्वच मंत्र्यांनी सामूहिक राजीनामा दिला असून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची गाडी राजभवनमधून बाहेर पडत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे, राज्यातील भाजपा व जेजेपी यांची आघाडी संपुष्टात आली आहे.
हरियाणा विधानसभेतील स्थिती
भाजपा - ४१भाजपासोबत असलेले अपक्ष ६हरियाणा लोकहित पार्टी - १ ( भाजपाला पाठिंबा)जेजेपी वेगळे झाल्यास भाजपाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या ४८बहुमतासाठी लागणारा आकडा - ४६