महाराष्ट्र आणि देशातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी प्रकरणात सुनावण्यात आलेल्या २ वर्षांच्या शिक्षेनंतर विरोधकांनी एकत्र मोट बांधली असून शरद पवार यांच्यासोबत चर्चा केलीय. या बैठकीत, देशातील लोकशाही, मुलभूत हक्कांवर येणारी गदा आणि भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात येत असल्याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. तर, व्हीएमच्या दुरुपयोगासंबंधांतील सर्व प्रकारच्या शंका-कुशंकांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी विरोधकांनी भूमिका व्यक्त केली.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाला ईव्हीएमबाबत निर्वाणीचा जाब विचारण्याचा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत त्यावर सहमती झाली. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी नावावरुन केलेल्या टीकेप्रकरणात सूरतच्या न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावल्याबद्दलही शरद पवार यांच्यसह सर्व विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भारतातील राजकीय पक्ष, नेते आणि नागरिकांचा आवाज दाबण्याचा वारंवार होत असलेला प्रयत्न ही गंभीर चिंतेची बाब आहे, असे शरद पवार यांनी म्हटलं. यावेळी, राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या २ वर्षांच्या शिक्षेकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच, राष्ट्रवादीचे खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांचेही प्रकरण याप्रकरारचे असल्याचे त्यांनी म्हटले. आज प्रत्येकाला चिंता करावी लागतेय, ह्या राजकीय प्रवृत्तीचा निषेध करतो, असेही पवार यांनी म्हटले.
आयोगाने ईव्हीएमबाबत लेखी निराकरण करावे
निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या विश्वासार्हतेसंबंधातील सर्व आक्षेपांचे लेखी निराकरण करावे. प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाही तर पुढे काय करायचे याचा निर्णय घेऊ, असा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला. शरद पवार यांच्या ६, जनपथ निवासस्थानी झालेल्या या बैठकीत काँग्रेसचे खा. दिग्विजय सिंह, ज्येष्ठ विधिज्ञ खा. कपिल सिब्बल, ठाकरे गटाचे खा. अनिल देसाई, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, समाजवादी पक्षाचे प्रा. रामगोपाल यादव, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. याशिवाय लोकसभेनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या दोन्ही निवडणुका महाराष्ट्रातील सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला देखील लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.