लोकसभेची सेमी फायनल म्हटल्या गेलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल येत्या रविवारी, ३ डिसेंबरला लागणार होता. परंतू, निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. मिझोरममधील मतमोजणी ३ ऐवजी चार डिसेंबरला केली जाणार आहे. अन्य चार राज्यांची मतमोजणी ठरलेल्या दिवशीच होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून मिझोरममधील निकालाची तारीख बदलण्याची मागणी केली जात होती. यासाठी सर्वच पक्षांमध्य़े एकमत दिसून आले होते. रविवार हा ख्रिश्चनांसाठी पवित्र दिवस असल्याचे या पक्षांचे म्हणणे होते. यामुळे ख्रिश्चनबहुल मिझोरममध्ये मतमोजणीची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी केली जात होते. यावर स्थानिक पक्ष आणी भाजपा, काँग्रेस या सर्वच पक्षांची संमती होती.
अखेर निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करत मतमोजणी एक दिवसाने पुढे ढकलली आहे. या पक्षांनी आयोगाला एक पत्रही लिहिले होते. यानुसार मिझोरममध्ये रविवारी कोणताही कार्यक्रम आयोजित केला जात नाही, असेही म्हटले होते.
मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान झाले होते. परंतू, याची मतमोजणी चार राज्यांसोबतच ठेवण्यात आली होती. मतदानाच्या जवळपास महिनाभराने ही मतमोजणी होणार आहे. याआधी निवडणूक आयोगाने राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तारीखही बदलली होती.