संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. सोमवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेत ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली, सूत्रांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दीड तास चाललेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात बुधवारी होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.
मोदी मंत्रिमंडळाची बैठक संपली; उद्या नव्या संसदेत काम, विरोधक तिथेही गोंधळ घालणार?
महिला आरक्षण विधेयक मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानण्यासाठी भारतीय जनता पक्ष दिल्ली-एनसीआरमधून हजारो महिलांना दिल्लीत आणण्याची योजना आखत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, महिला आरक्षण विधेयकावर मंत्रिमंडळाच्या निर्णयावर काँग्रेसने आनंद व्यक्त केला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, “काँग्रेस पक्ष दीर्घकाळापासून महिला आरक्षण लागू करण्याची मागणी करत आहे. “ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि विधेयकाच्या तपशीलाची वाट पाहतो.” असंही ते म्हणाले.
सरकारने रविवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी आघाडी 'इंडिया'सह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) अनेक पक्षांनी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची जोरदार बाजू मांडली होती.
सर्वच पक्षांनी महिला आरक्षण विधेयकाची मागणी लावून धरली होती.या बैठकीत लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांसारख्या निवडून आलेल्या संस्थांमध्ये महिला आरक्षणाची जोरदार बाजू मांडण्यात आली. या मागणीला भारतीय जनता पक्ष सहयोगी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना पाठिंबा दिला.