नवी दिल्ली:22 सप्टेंबर रोजी शीख संप्रदायाचे संस्थापक गुरु नानक देव यांची पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारनं शीख यात्रेकरूंसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून, पाकिस्ताननं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या यात्रेकरूंना गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूरला भेट देण्याची परवानगी दिली आहे.
करतारपूर गुरुद्वारा उघडण्याचा निर्णय नॅशनल कमांड आणि ऑपरेशन सेंटरने (एनसीओसी) शनिवारी घेतला.
डॉन वृत्तपत्राच्या बातमीनुसार, एनसीओसीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, कोविड -19 पासून बचाव करणाऱ्या नियमांचं पालन करुन शीख यात्रेकरुंना पुढील महिन्यापासून करतारपूरला जाण्याची परवानगी दिली जाईल. विशेष म्हणजे, कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे भारताला 22 मे ते 12 ऑगस्ट दरम्यान 'क' वर्गात ठेवण्यात आलं होतं.
आता लोकांना लसीच्या दोन्ही डोसचे प्रमाणपत्र आणि गेल्या 72 तासांत केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल दाखवून पाकिस्तानात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त, विमानतळांवर रॅपिड अँटीजन चाचणी देखील केली जाईल. जर कोणी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले तर त्या प्रवाशाला पाकिस्तानात प्रवेश दिला जाणार नाही.