सध्या देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि १३ राज्यांच्या पोटनिवडणुकांचा काळ सुरु आहे. यापैकी महाराष्ट्र विधानसभा आणि उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीवर सगळ्यांचे लक्ष आहे. अशातच पूर्वेकडील राज्यात मोठी घडामोड घडली आहे. हे राज्य विधानसभेत विरोधकच नसलेले एकमेव राज्य ठरले आहे.
सिक्कीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. तेथील प्रमुख विरोधी पक्ष सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट (एसडीएफ) संपला आहे. यामुळे सिक्कीम विधानसभा विरोधी पक्षच राहिलेला नाही. सिक्कीममध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. सोरेंग-चाकुंग आणि नामची-सिंघीथांग या जागांवर एसडीएफने उमेदवार उतरविले होते. परंतू, या उमेदवारांचे अर्ज अयोग्य घोषित करण्यात आले आहेत. १३ नोव्हेंबरला या ठिकाणी मतदान होणार होते. यामुळे सत्ताधाऱी एसकेएमचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
देशात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्ष नाही, असे घडले आहे. प्रेम बहादुर भंडारी आणि डेनियल राय यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. यामुळे सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे उमेदवार आदित्य गोळे आणि सतीश चंद्र राय हे बिनविरोध निवडले गेले आहेत. मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या नेतृत्वात एसकेएमकडे आता विधानसभेचे सर्वच्या सर्व ३२ आमदार असणार आहेत.
दोन्ही उमेदवारांकडे प्रस्तावकांची अपेक्षित संख्या नव्हती असे अर्ज पडताळणीत समोर आले आहे. यामुळे त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तर पोबिन हंग सुब्बा यांचाही अर्ज अपूर्ण अॅफिडेविट दिल्याने फेटाळण्यात आल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान विरोधी पक्षांनी यावर टीका केली आहे. विरोधी पक्षांनी यावर टीका करताना लोकशाहीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच याविरोधात हायकोर्ट, सुप्रिम कोर्टात जाणार असल्याचेही म्हटले आहे.