झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सोशल मीडियाच्या बायोमधूनही पक्षाचे नाव हटवले आहे. यामुळे ते पक्षाच नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. चंपाई सोरेन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या तीन दिवसांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे मी माझ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्यांना फक्त खुर्चीची चिंता होती. ज्या पक्षासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्या पक्षात माझे अस्तित्वच नाही, असे मला वाटले, या दरम्यान अशा अनेक अपमानास्पद घटना घडल्या, ज्यांचा उल्लेख मला या क्षणी करायचा नाही. इतका अपमान आणि अवहेलना केल्यानंतर मला पर्यायी मार्ग शोधणे भाग पडले, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
चंपाई सोरेन म्हणाले, गेल्या ४ दशकांच्या माझ्या राजकीय प्रवासात पहिल्यांदाच मी आतून तुटलो. काय करावे समजत नव्हते. मी शांतपणे बसून दोन दिवस आत्मपरीक्षण केले, संपूर्ण घटनेत माझी चूक शोधली. सत्तेचा लोभही नव्हता, पण माझ्या स्वाभिमानाला झालेली ही जखम मी कोणाला दाखवू? माझ्या प्रियजनांनी दिलेली वेदना मी कुठे व्यक्त करू?, असंही यात म्हटले आहे.
"सत्ता मिळाल्यावर बाबा तिलका मांझी, भगवान बिरसा मुंडा आणि सिदो-कान्हू यांसारख्या वीरांना आदरांजली अर्पण करून राज्यसेवा करण्याचा संकल्प केला होता, झारखंडच्या प्रत्येक मुलाला माहित आहे की, माझ्या कार्यकाळात राज्याची सेवा करण्याचा संकल्प केला आहे. मी कधीही कोणावर अन्याय केला नाही किंवा होऊ दिला नाही. दरम्यान, होळीच्या दुसऱ्या दिवशी, माझे पुढील दोन दिवसांचे सर्व कार्यक्रम पक्षनेतृत्वाने पुढे ढकलले असल्याचे मला समजले. यामध्ये एक सार्वजनिक कार्यक्रम दुमका येथे होता, तर दुसरा कार्यक्रम पीजीटी शिक्षकांना नियुक्ती पत्र वाटपाचा होता. असे विचारले असता, युतीने ३ जुलै रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे, तोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम दुसऱ्याने रद्द करून घेण्यापेक्षा लोकशाहीत अपमानास्पद काही असू शकते का?, असा सवालही त्यांनी केला. अपमानाचा हा कडू घोट पिऊनही मी सांगितले की, नियुक्तीपत्रांचे वाटप सकाळी आहे, तर दुपारी विधीमंडळ पक्षाची बैठक आहे, त्यामुळे मी तिथे जाऊन उपस्थित राहीन.
सोरेन म्हणाले की, पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची वर्षानुवर्षे बैठक होत नसताना आणि एकतर्फी आदेश निघत असताना आपल्या समस्या कुणाकडे जाऊन मांडायच्या? या पक्षात माझी गणना ज्येष्ठ सदस्यांमध्ये होते, बाकीचे कनिष्ठ आहेत, आणि माझ्यापेक्षा वरिष्ठ असलेले सुप्रीमो आता प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणात सक्रिय नाहीत, मग माझ्याकडे कोणता पर्याय होता? ते सक्रिय झाले असते तर कदाचित परिस्थिती वेगळी असती, असंही त्यांनी म्हटले आहे.
चंपाई सोरेन म्हणाले की, विधीमंडळ पक्षाची बैठक बोलवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, मात्र मला बैठकीचा अजेंडाही सांगण्यात आला नाही, बैठकीत माझा राजीनामा मागितला गेला. मला आश्चर्य वाटले, पण मला सत्तेचे आकर्षण नव्हते, म्हणून मी तात्काळ राजीनामा दिला, पण माझ्या स्वाभिमानाला धक्का लागल्याने माझे मन भावूक झाले.