Andhra Pradesh Bomb Blast : ऐन दिवाळीत आंध्र प्रदेशात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील एलुरु येथे फटाक्यांच्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता यामध्ये एका स्कूटीचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे या स्फोटात मृत्यू झालेल्या आणि जखमींची अवस्था फारच वाईट आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. फटाक्यांच्या स्फोटाच्या तडाख्यात रस्त्यावर उभे असलेले काही लोकही आले आहेत.
एलुरु शहरात स्कूटरवरून जाणाऱ्या फटाक्यांच्या पिशवीचा अचानक स्फोट झाला, ज्यामुळे चालकाचा मृत्यू झाला. तर या स्फोटात अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. एलुरु शहरातील एका निवासी भागात हा अपघात झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली असून, अपघाताची तीव्रता पाहून तुम्हाच्याही अंगावर काटा येईल. रस्त्यावर उभ्या असलेल्या काही लोकांजवळून एक स्कूटी जात असताना हा स्फोट झाला. स्कूटी लोकांच्या जवळून जाताच स्फोट झाला आणि धावपळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुण स्कूटीवर फटाक्यांची पिशवी घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांजवळून जात होते. दरम्यान, स्कूटीचा टायर खड्ड्यात गेल्याने चालकाचा तोल गेला आणि फटाक्यांची पिशवी खाली पडली. फटाक्यांची पिशवी पडताच मोठा स्फोट झाला. यामध्ये स्कूटीवर असणाऱ्या दोघांसह शेजारी उभ्या असलेल्या लोकांनाही स्फोटाचा फटका बसला. या भीषण अपघातात स्कूटीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले.
स्फोटानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली होती. स्थानिक नागरिक जखमींच्या मदतीसाठी तात्काळ धाव घेतली. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. यासोबतच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. सुधाकर असे मृताचे नाव असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, स्फोटाची तिव्रता इतकी होती की संपूर्ण परिसराच गडद राखाडी धूर पसरला होता. स्फोटानंतर आजूबाजूला कागदासह गाडीचे तुकडे पसरले होते. धूर निघत असताना दोन माणसे स्फोटातून कसेबसे बचावून धावत सुटले होते. दोन्ही माणसे स्फोटामुळे कान पकडून मदतीसाठी जवळच्या घरातील लोकांकडे जाताना दिसली.