नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने बुधवारी रिअल-टाइम मतदान डेटा आणि निवडणूक आयोगाने जाहीर केलेला अंतिम डेटा यांच्यातील प्रचंड तफावतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, मतदार या विचित्र घडामोडीमुळे खूप चिंतेत आहेत. काँग्रेस नेते आणि पक्षाच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी सांगितले की, फरक सुमारे १.७ कोटी मतांचा होता आणि ही खूप मोठी संख्या आहे.
१०-११ दिवसांचा कालावधी का?‘मतदानाच्या चार टप्प्यांदरम्यान निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेल्या कामाबद्दलच्या विचित्र हालचालींमुळे मतदार चिंतेत आहेत. प्रथम, अंतिम मतदानाची आकडेवारी समोर आणण्यासाठी निवडणूक आयोगाला १०-११ दिवसांचा कालावधी लागतो आणि त्यानंतर वास्तविक मतदान आणि आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये १.७ कोटी मतांचे अंतर असते. हे खरोखरच अभूतपूर्व आहे, तसेच ईव्हीएम गहाळ झाल्याबद्दल अनुत्तरित प्रश्नदेखील खूप चिंताजनक आहेत,’ खेडा सामाजिक माध्यम एक्सवर एका पोस्टमध्ये म्हणाले.
प्रत्येक लोकसभा जागेवर २८,००० मतांची वाढ- पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश याबाबत म्हणाले की, ‘एकंदरीत १.७ कोटी मतांचा हा फरक प्रत्येक लोकसभा जागेवर २८,००० मतांच्या वाढीइतका आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. - भाजपच्या मोठ्या जागा गमावण्याचा अंदाज असलेल्या राज्यांमध्ये ही तफावत सर्वाधिक आहे.’ काँग्रेसबरोबरच इतर विरोधी पक्षांनीही अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यास झालेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित केले आहेत.