मुंबई - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रीयगृहमंत्री अमित शहा यांनी त्रिपुरातीलमहिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सत्ताधारी आघाडीला 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आणि महिला दिनाचे औचित्य साधून अमित शहा यांनी राज्यातील सरकारी नोकरीमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्रिपुरातील एका सभेला संबोधित करताना शहा यांनी राज्यातील भाजपप्रणित सरकारने केलेल्या कामांचा पाढाच वाचला. तसेच, आगरतलाला देशातील रेल्वेमार्गाने इतर प्रदेशांसोबत जोडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यासोबतच, सुंदर राज्य असलेल्या त्रिपुरालाही 50 वर्षे पूर्ण होत आहेत. 25 वर्षांपासून त्रिपुरामध्ये कम्युनिष्टांनी सरकार चालवले. यापूर्वी 2015 मध्ये मी जेव्हा येथे आलो होतो, तेव्हा येथील जनता त्रस्त असल्याचं दिसून आल्याचे अमित शहा यांनी म्हटले. राज्यात गरिबांच्या नावाने कम्युनिष्टांनी 25 वर्षे येथे राज्य कारभार केला. मात्र, गरिबांसाठी काहीच केलं नाही. याउलट भाजपसह इतर 39 कार्यकर्त्यांची हत्या करण्याचं काम कम्युनिष्टांनी केलं. त्याचवेळी भाजपने येथे मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केली.