नवी दिल्ली : लोकोपयोगी कामांसाठी दिल्या जाणाऱ्या देणग्यांत भारतात मोठी वाढ होत असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. अतिश्रीमंत नागरिकांची संख्या वाढल्यामुळे दानधर्म करण्याचे, तसेच देणग्या देण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे अभ्यासात दिसून आले.गेल्या पाच वर्षांत भारतातील वैयक्तिक देणग्यांमध्ये, तसेच दानधर्मात सहापट वाढ झाली आहे. भारतातील श्रीमंतांनी २0११ मध्ये ६ हजार कोटींच्या देणग्या दिल्या होत्या. तो आकडा २0१६ मध्ये ३६ हजार कोटींवर गेला आहे. बेन अँड कंपनी या संशोधन संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. संस्थेचे भागीदार अर्पण सेठ यांनी सांगितले की, यात खासगी देणग्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. संशोधन, मूल्यांकन, पुढाकार, स्वयंसेवी संस्था यांच्या कामांसाठी खासगी देणगीदार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.भारतामध्ये २0११ नंतरच्या काळात अतिश्रीमंतांची संख्या दुप्पट झाली आहे, तसेच २00९ ते २0१५ या काळात समाजकार्यासाठी वेळ पैसा देणाऱ्यांची संख्याही दुप्पट झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
लोकोपयोगी देणग्यांमध्ये भारतात मोठी वाढ
By admin | Published: March 09, 2017 1:41 AM