नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करून आम्ही या प्रदेशाला मुख्य प्रवाहात आणलं आहे. आज कित्येक वर्षांनी देशवासियांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे, मोदी यांनी जनतेला संबोधित करताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कलम 370 रद्द करण्याबाबतचे फायदे सांगितले. देशाची सर्वोच्च संसद कायदे बनवत होती. मात्र, कल्पना करू शकत नाही की हे कायदे देशाच्या एका भागाला लागूच होत नव्हते. याचप्रमाणे आधीच्या आणि आपल्या सरकारने राबविलेल्या योजनाही जम्मू काश्मीरला लागू होत नव्हती. येथील नागरिक यामुळेच विकासापासून वंचित राहत होते. शिक्षणातील आरक्षण, नोकऱ्या, विविध योजना या नागरिकांना मिळत नव्हत्या. यामुळे हे कलम रद्द झाल्याने या जनतेचा फायदाच होणार आहे.
यावेळी मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर, लडाखवासियांचे अभिनंदनही केले. तसेच पोलिस खात्यातील आणि सरकारी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत. तसेच सध्या नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही सरकारी योजनांपासून लांब राहावे लागले होते. मात्र, आम्ही लवकरात लवकर याचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना फायदा मिळवून देणार आहे, असे मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, मोदी यांच्या भाषणाआधी जम्मू काश्मीरच्या तुरुंगात असलेल्या कैद्यांना हवाई दलाच्या विमानांमधून आग्रायेथी तुरुंगात हलविण्यात आले आहे. जम्मूमध्ये परिस्थिती बिघडल्यास तेथील तुरुंग अपुरे पडू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.