बंगळुरू - कर्नाटकमध्येवीज मोफत देण्याची घोषणा करुन सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने वीजेच्या दरात मोठी वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध व्यापारी आणि उद्योजक रस्त्यावर उतरले आहेत. बंगळुरूतील अनेक भागात व्यापारी आणि लघुउद्योजकांनी वीजदरात झालेल्या दरवाढीविरुद्ध आवाज उठवला आहे. त्याविरुद्ध आंदोलन करत मोर्चाही काढण्यात आला. मोठ्या संख्येने व्यापारी आणि लहान उद्योजक या विरोध प्रदर्शनात सहभागी झाले होते.
हुबळीच्या कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (KCCI) ने या बंदचे आवाहन केले होते. त्यास, व्यापारी आणि उद्योजकांनी प्रतिसाद देत दुकाने बंद केली होती. विशेष म्हणजे राज्य सरकारने याच आठवड्यात गृहज्योति योजनेंतर्गत घरगुती वीज कनेक्शनसाठी २०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, कर्नाटक विद्युत नियमाक आयोगाने ५ जून रोजी वीजेच्या दरात वाढ केली आहे. २.८९ रुपये प्रति युनिट दर वाढवण्यात आले आहेत. या दरवाढीविरोधात व्यापारी आणि उद्योजकांनी हातात बॅनर, पोस्टर आणि निषेधाचे फलक घेऊन मोर्चा काढला होता.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी रविवारी यासंदर्भात बोलताना म्हटले की, याबाबत उद्योजकांसोबत लवकरच बैठक घेतली जाईल. तर, ग्राहकांना २ महिन्यांचं बिल आलं आहे, त्यामुळे हे बिल जादा वाटत आहे. यापुढे प्रत्येक महिन्याला बिल दिलं जाईल, असे सिद्धरमैय्या यांनी म्हटलं.
हुबळ-धारवाड, शिवमोगा, बेलगावी, बेल्लारी, विजयनगर, दावणगेरे आणि कोप्पल समेत अन्य ठिकाणांवर हे आंदोलन करण्यात आले. सरकारने वीज दरवाढीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. KCCI चे कार्यवाहक अध्यक्ष संदीप बिदासरिया यांनी दावा केला आहे की, वीज दरांमध्ये ५०-७० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे, लहान व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.