बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आणि लोजपाचे चिराग पासवान यांच्यात जोरदार राजकारण रंगले आहे. निमित्त होते संक्रांतीवेळच्या दही-चुडा भोजनाचे. पासवान यांनी त्यांच्या कार्यालयात दही-चुडाचे आयोजन केले होते. एनडीएत असल्याने व पुढील निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी नितीशकुमार यांना बोलविले होते. नितिशकुमार दहीचुडासाठी लोजपा कार्यालयात आले तेव्हा पासवान गैरहजर राहिले. यावरून आता दोघांमधील राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
दही-चुडाचे आयोजन वर्षानुवर्षाचे वाद, रुसवेफुगवे मिटविण्यासाठी केले जाते. यातही राजकारण झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर एनडीएत मानापमानाचा वाद पेटणार आहे. लोजपा कार्यालयात बोलविले परंतू चिराग पासवानच नसल्याने नितीश कुमार नाराज झाले आहेत. त्यांनी दही-चुडाचे भोजन न करताच तिथून काढता पाय घेतला.
जदयूच्या नेत्यांनी हा मुख्यमंत्र्यांचा झालेले अपमान म्हटले आहे. तर पासवान यांनी यावर मुख्यमंत्री आले तेव्हा आपण पुजेला बसलो होते. लगेचच तिकडे जाणे शक्य नव्हते. परंतू, मुख्यमंत्री आले हे आमच्यासाठी सन्मानाचे आहे. कार्यकर्त्यांसाठी ही मोठी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेचा आम्ही सन्मान करतो, असे म्हटले आहे.
सूत्रांनुसार या घटनेनंतर चिराग पासवान यांनी नितिशकुमार यांना अनेकदा फोन केला, परंतू त्यांनी पासवान यांच्याशी चर्चा केली नाही. लोजपाला नितिशकुमार यांच्यामुळे कार्यालयासाठी बंगला मिळाला आहे. या बंगल्यामध्ये पूर्वी पशुपती पारस यांचा पक्ष होता. त्यांच्याकडून हा बंगला खाली करून तो चिराग यांना देण्यात आला.