नवी दिल्ली: भाजप नेत्यांना आता सरकारी वाहनांचा वापर करता येणार नाही. पक्ष नेतृत्वाने यासंदर्भातील फर्मान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जारी केला आहे. जारी केलेल्या सूचनांनुसार आता भाजप नेत्यांना कुठल्याही कार्यक्रमात जाण्यासाठी किंवा इतर वापरासाठी स्वतःची गाडी वापरावी लागेल.
भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहनाची सुविधा मिळणार नाही, असे निर्देशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच सर्व नेते यापुढे स्वत:ची गाडी वापरतील. जारी केलेली सूचना पक्षाचे नेते, आमदार, खासदार यांना असेल. आतापर्यंत पक्षाचे प्रदेश पदाधिकारी संघटनात्मक कार्यक्रमांसाठी सरकारी वाहने वापरत होते. खासदार, आमदार, आमदार झाल्यानंतरही सरकारी वाहने वापरली गेली. पण, आता असे होणार नाही.
आतापर्यंत नेत्यांना कार्यालयातून कार आणि ड्रायव्हर दिला जायचा. पण, आता ही सुविधा मिळणार नाही. नेत्यांना आता स्वत:च्या वाहनानेच प्रवास करावा लागणार आहे. आजवर कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी भाजपचे नेते सरकारी वाहनांचा वापर करायचे. मात्र आता भाजपने त्यावर बंदी घातली आहे. भाजपच्या या आदेशानंतर पक्षामध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.