नवी दिल्ली: बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. भाजपाविरोधातले १५ पक्ष या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत देखील पाटण्यात दाखल झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष बाकी आहे. त्यामुळं सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. भाजपविरोधात विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नितीशकुमार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून ते प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या बैठकीआधी शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
बैठकीत देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. मणिपूरमधील सध्याची परिस्थिती यांसारख्या विषयावर चर्चा होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणं अशी कृत्ये देशात वाढली आहेत. विशेषतः ज्या राज्यांमध्ये भाजपाचं सरकार नाही तिथे हे सगळं घडत असल्याचं शरद पवारांनी सांगितले. तसेच अन्य राज्यातील नेते देखील त्यांचे स्थानिक प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.
दरम्यान, विरोधी पक्षांच्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआय महासचिव डी राजा, सीपीएम नेते सीताराम येचुरी आणि दीपांकर भट्टाचार्य सामील होणार आहेत.