नवी दिल्ली - लोकशाहीत प्रशासन आणि सरकारवर टीका होत असते. ही टीका सहन करता आली पाहिजे. या टीका करणाऱ्यांवर आवाज दडपला जाणार असेल तर ही सर्वात मोठी चूक आहे अशा शब्दात भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्वनर रघुराम राजन यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. जर टीकाकरांना सरकारी अधिकाऱ्यांकडून फोन येत असतील. त्यांना गप्प बसण्यासाठी दबाव टाकत असतील. सत्ताधारी पार्टीच्या ट्रोलरकडून लक्ष्य केलं जात असेल. तर त्याने टीका करणं कमी होतं असं रघुराम राजन यांनी सांगितले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून रघुराम राजन यांनी हे भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, सरकारविरोधातील कटूसत्य समोर आलं नाही तर सरकार आनंदात असतं. आपण किती महान आहोत हे पाहण्यासाठी इतिहासात पाहिलं पाहिजे. मात्र त्या इतिहासाचे दाखले देऊन छाती बडवून घेणे अन् मोठेपणा सांगणे यातून असुरक्षिततेची भावना समोर येते असं त्यांनी सांगितले.
तसेच देशात वेगवेगळे विचार आहेत, संस्कृती आहे. मात्र कोणत्याही विचारांवर आणि संस्कृतीवर एका समाजाची मक्तेदारी लादण्याचा प्रयत्न केला तर हे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून चुकीचे आहे. विचारांवर एका समाजाची मक्तेदारी असू शकत नाही. मतभेद आणि विचार दडपल्याने कोणतीही चुकीची धोरणे बरोबर ठरत नाही अशा शब्दात रघुराम राजन यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, देशात विविध विचारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. देशासमोर आज अनेक आव्हानं आहेत. समाजात अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत जर अधिकारी अथवा सरकारला त्यांच्या चुका दाखवून दिल्या नाही तर सरकार आत्मकेंद्रीत होईल. तसेच इतर देशांची स्पर्धा करत असताना आपल्या संस्कृतीला धोका निर्माण होईल हे चुकीचं असल्याचं मत रघुराम राजन यांनी मांडले आहे.