देशभरात भाजपाचा झंझावात सुरु असताना एकहाती पंजाबची सत्ता खेचून आणणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंगांना (Amarinder Singh) काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून काढून टाकले. भाजपातील वादावरून काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांची विकेट काढली. यामुळे नाराज झालेले व दिवंगत राजीव गांधी यांचे मित्र असलेले कॅप्टन अमरिंदर यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. (Amarinder Singh to reach Delhi today; likely to meet Amit Shah, JP Nadda)
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे आज सायंकाळी ४.३० वाजता दिल्लीला येण्याची शक्यता आहे. सुत्रांनुसार कॅप्टन दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी (Amit Shah) चर्चा करणार आहेत. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून भाजपच्या मुख्यालयात मात्र जोरदार हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे.
काँग्रेसमध्ये आज जिग्नेश मेवानी आणि कन्हैय्या कुमार प्रवेश करणार आहेत. मात्र, याचा उत्सव साजरा करण्याची तयारी करत असताना काँग्रेसमध्ये सन्नाटा पसरला आहे. पंजाबमधील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचे समजताच काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. असे झाल्यास काँग्रेसला पंजाबची सत्ता सोडावी लागण्याची शक्यता आहे. अमरिंदर सिंगांबरोबर त्यांचे समर्थक आमदारही भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. यामुळे पंजाबमध्ये मुदतपूर्व निवडणूक लागण्याची शक्यता आहे.