Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर करण्यात आलेले एक्झिट पोल चुकीचे ठरणार असल्याची चिन्हे असून विरोधकांच्या इंडिया आघाडीने सत्ताधारी एनडीएला चांगली लढत दिल्याचं आतापर्यंत हाती आलेल्या कलांमधून दिसत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने बहुमताचा आकडा पार केला असला तरी भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे आता प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढलं असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडवर आल्याची माहिती आहे. पवार यांनी एनडीएतील घटकपक्ष असलेल्या जेडीयूचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते.
भाजपला एकट्याच्या जोरावर २७२ ची मॅजिक फिगर गाठण्यास यश आलं नसल्याचं आतापर्यंतच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडूनही जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू असून या प्रयत्नात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण पवार यांचा देशभरातली विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चांगला संपर्क आहे. आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी त्यामध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीच्या जवळपास ३० जागा आहेत. पवार यांनी नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधला असून ते चंद्राबाबू नायडू यांनाही फोन करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार गटाचा 'स्ट्राईक रेट' सगळ्यात भारी
महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याचं दिसत आहेत. तसेच शरद पवार यांची जादूही या निकालांमध्ये दिसून आली असून, शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेले सर्व उमेदवार आघाडीवर आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला १० जागा आल्या होत्या. दरम्यान, शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवत असलेले अमोल कोल्हे, भास्कर भगरे, बजरंग सोनवणे, निलेश लंके, बाळ्यामामा म्हात्रे, अमर काळे, सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते पाटील आदी उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३० आणि महायुती १७ जागांवर आघाडीवर आहे. तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने आघाडी घेतली आहे.