NCP Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवशी पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या विविध नेत्यांनी पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटांत कटुता निर्माण झाल्याची चर्चा असताना आजच्या भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी १० दिवसांपूर्वीच शरद पवार यांची भेट घेत चर्चा केल्याचे वृत्त आता समोर आले आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी १० दिवसांपूर्वी नवी दिल्ली इथं शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुतीने पुन्हा सत्ता काबीज केली. त्यामुळे आणखी पाच वर्षे विरोधात बसण्यापेक्षा सत्तेसोबत जायला हवं, असा सूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील काही खासदारांनी आळवला असल्याचे बोलले जाते.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर दुसरीकडे, महिनाभरात गुड न्यूज मिळेल, आम्ही तुमच्यासोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसू शकतो, असं सूचक वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी पारनेर येथील एका मेळाव्यात केलं होतं. त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीत राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, आगामी काळात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार काय म्हणाले?
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे की, "आज साहेबांचा वाढदिवस, उद्या काकीचा वाढदिवस आहे त्यामुळे या दोघांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो होतो. दर्शन घेतले, चहापाणी झालं. त्यासोबत इतर गोष्टींवर चर्चा झाली. परभणीला असं का घडलं अशा इतर बाबींवर बोललो. संसदेचे कामकाज, मंत्रिमंडळ विस्तार, अधिवेशन याबाबतही चर्चा झाली. राजकीय चर्चा होत असतात. आज १२ डिसेंबरला साहेबांचा वाढदिवस आहे, त्यासाठी सगळे जण त्यांना भेटून शुभेच्छा देतात, आशीर्वाद घेतात. आम्हीही त्यासाठी आलो आहे," अशी माहिती अजित पवार यांनी दिली.