हवाई क्षेत्रात भारताची ढाल असणाऱ्या भारतीय हवाई दलाची कॉम्प्युटर सिस्टीम हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. मालवेअर अॅटॅक करून हवाई दलाचा डेटा चोरण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु, वेळीच ही बाब लक्षात आल्याने हवाई दलाचा महत्वाचा डेटा वाचला आहे. हे हॅकर्स कोण होते हे अद्याप समजू शकलेले नाहीय.
गुगलच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या आधारे ओपन सोर्स मालवेअरद्वारे हा हल्ला करण्यात आला होता. सायबल ही अमेरिकन सायबर थ्रेट इंटेलिजन्स कंपनी आहे. या कंपनीने 17 जानेवारी 2024 ला गो स्टीलर मालवेअरचा शोध लावला होता. हा मालवेअर GitHub वर सहजरित्या उपलब्ध होत होता. याच मालवेअरच्या मदतीने भारताची संरक्षण यंत्रणआ भेदण्याचा प्रयत्न झाला आहे.
हा हल्ला कधी झाला हे अद्याप समजलेले नसले तरी हवाई दलाचा डेटा सुरक्षित असल्याचे सांगण्य़ात आले आहे. हवाई दलाचा कोणताही डेटा चोरीला गेला नाही. मालवेअरचा हल्ला फोल ठरला. हवाई दलाकडे पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि फायरवॉल यंत्रणा आहे, ज्यामुळे डेटा चोरीला आळा बसल्याचे या प्रकरणाशी संबंधीत अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हॅकर्सनी गेल्या वर्षी सप्टेंबरमधील 12 लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हवाई दलाच्या आदेशाचा वापर करून रिमोट-नियंत्रित ट्रोजन हल्ल्याची योजना आखली होती. यासाठी त्यांनी Su-30_Aircraft Procurement नावाची ZIP फाइल तयार केली होती. ती फाईल हवाई दलाच्या संगणकांवर पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.