नवी दिल्ली - राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादादरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही. राजस्थानमध्ये जे काही घडलं, त्याचं मला दु:ख आहे. त्या प्रकारामुळे मला धक्का बसला आहे. त्यासाठी मी सोनिया गांधी यांची माफीही मागितली आहे, असे अशोक गहलोत यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांची भेट घेऊन आल्यानंतर अशोक गहलोत म्हणाले की, गेल्या ५० वर्षांपासून म्हणजेच इंदिरा गांधी यांच्या काळापासून मी काँग्रेसचा एक विश्वासपात्र सैनिक म्हणून काम केले आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून जी काही जबाबदारी दिली गेली, ती मी प्रामाणिकपणे निभावली आहे.
अशोक गहलोत यांनी सांगितले की, आज राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेसाठी निघाले आहेत. राहुल गांधी यांनी जेव्हा निवडणूक लढवण्यास नकार दिला, तेव्हा मी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. त्यानंतर राजस्थानमध्ये जी घटना घडली. त्या घटनेने मला धक्का दिला आहे. त्या प्रकारामुळे मी मुख्यमंत्रिपदावर कायम राहू इच्छितो, असा संदेश संपूर्ण देशामध्ये गेला. मी या प्रकारासाठी सोनिया गांधी यांची माफी मागितली आहे. मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे. झाल्या प्रकारामुळे खूप दु:खी आणि व्यथित झालो आहे. त्यामुळे मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच माझ्या मुख्यमंत्रिपदाबाबत सोनिया गांधी निर्णय घेतील.
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत असलेल्या अशोक गहलोत यांचं नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पुढे आलं होतं. त्याला गांधी कुटुंबीयांनीही हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र राजस्थानमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला. त्यातून काँग्रेसमध्ये मोठ्या वादाला तोंड फुटले होते. अखेर त्याची परिणती अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्यात झाली आहे.