नवी दिल्ली-
भारतात कोरोनाचा नवा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट सापडला आहे. इंडियन सार्स कोव्ह-२ जिनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) या संस्थेनं याची पुष्टी दिली आहे. नवे व्हेरिअंट हे ओमायक्रॉन व्हेरिअंटचे उप-प्रकार आहेत. देशात गेल्या वर्षी ओमायक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. या व्हेरिअंटचे उप-प्रकार आता भारतात सापडू लागले आहेत.
देशात काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं असल्यानं कोरोनाचा याआधीसारखा प्रकोप होईल याची शक्यता फारच कमी आहे. BA.4 आणि BA.5 या व्हेरिअंटचा पहिला रुग्ण देशात तामिळनाडू येथे आढळून आला आहे. तर दुसरा रुग्ण तेलंगणामध्ये आढळून आला आहे. या नव्या व्हेरिअंटचा प्रतिकार करायचा असेल तर बुस्टर डोस घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ओमायक्रॉनचा उप-प्रकार असलेल्या BA.4 चा पहिला रुग्ण द.आफ्रिकेमध्ये आढळला होता. त्यानंतर हा व्हेरिअंट हळूहळू जगभरातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. त्यात आता भारताचाही समावेश झाला आहे. BA.4 याच व्हेरिअंटमुळे द.आफ्रिकेत कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळाला. या व्हेरिअंटमुळे रुग्णाच्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती लक्षणीयरित्या कमी होते. त्यामुळे याचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जा आहे. दरम्यान, भारतात लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं असल्यामुळे घाबरण्याची गरज नाही. पण निष्काळजीपणा बाळगता येणार नाही असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.