नवी दिल्ली: केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने सोमवारी काही अटींसह 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बायोलॉजिकल-ई कंपनीची कोरोना लस 'Corbevax' वापरण्याची शिफारस केली आहे. पण, अद्याप 15 वर्षाखालील बालकांना लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही, असे ते म्हणाले.
नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, लसीकरणाची अतिरिक्त गरज आहे आणि त्यासाठी आणखी लोकसंख्येच्या समावेशाचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने यापूर्वीच 28 डिसेंबर रोजी कॉर्बेव्हॅक्सला आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित स्वरुपात मान्यता दिली आहे. ही कोविड-19 विरुद्ध स्वदेशी विकसित RBD आधारित लस आहे. मात्र, देशातील लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश करण्यात आलेला नाही.
सूत्रांनी सांगितले की, सीडीएससीओच्या कोविड-19 वरील तज्ञ समितीने अर्जावर चर्चा केली आणि आपत्कालीन वापराच्या काही अटींसह 12 ते 18 वर्षांखालील वयोगटातील मुलांसाठी बायोलॉजिकल-ईच्या कॉर्बेव्हॅक्स लसीला वापरण्याची शिफारस केली. ही शिफारस अंतिम मंजुरीसाठी डीसीजीआयकडे पाठवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, 9 फेब्रुवारी रोजी DCGI ला पाठवलेल्या अर्जात बायोलॉजिकल-ईचे गुणवत्ता आणि नियामक व्यवहार प्रमुख श्रीनिवास कोसाराजू यांनी सांगितले की, कंपनीला 5-18 वर्षे वयोगटातील कॉर्बेव्हॅक्सच्या फेज II-III क्लिनिकल चाचण्या घेण्याची परवानगी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच देण्यात आली आहे. कॉर्बेव्हॅक्स लस स्नायूद्वारे शरीरात टोचली जाईल आणि 28 दिवसांच्या आत दोन डोस घेतले जातील. ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात साठवली जाते.