Lok Sabha Elections ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याआधी नवनवे मित्रपक्ष सोबत घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. अशातच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाची घरवापसी झाली असून चंद्राबाबू नायडू यांनी काही वेळापूर्वी जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोण किती जागांवर लढणार, याबाबतची माहिती नायडू यांच्याकडून देण्यात आली आहे.
जागावाटपाविषयी माहिती देताना चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे की, "अमरावतीत आज झालेल्या बैठकीत भाजप, टीडीपी आणि जेएसपी या तीन पक्षांनी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. या महत्त्वपूर्ण पावलामुळे आता आंध्र प्रदेशातील लोक आपल्या राज्यावर पुन्हा हक्क मिळवण्याकडे आणि उज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करणार आहे," असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला आहे.
कोणता पक्ष किती जागा लढवणार?
चंद्राबाबू नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशात भाजप लोकसभेच्या ६ आणि विधानसभेच्या १० जागा लढवेल, टीडीपी लोकसभेच्या १७ आणि विधानसभेच्या १४४ तर जेएसपी लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या २१ जागा लढवणार आहे.
चंद्राबाबू नायडू हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात एनडीए आघाडीत होते. आता ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाल्याने भाजपला आंध्र प्रदेशात राजकीय फायदा होणार हे निश्चित आहे.
दरम्यान, 'अब की बार ४०० पार' म्हणत भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. तसेच ४०० जागांच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी भाजपने मागच्या काही महिन्यांत अनेक अनेक मित्रपक्ष जोडले आहेत. उत्तर प्रदेशात आरएलडी, बिहारमध्ये जेडीयू हे मित्रपक्ष एनडीएमध्ये परतले आहेत. तर ओडिशामध्ये बीजेडी पक्ष एनडीएत येण्याच्या तयारीत आहे. ४०० पारचं लक्ष्य गाठण्यासाठी भाजप आपले मित्रपक्ष वाढवत असल्याचं चित्र आहे.