राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उदयपूर- अहमदाबाद रेल्वे ट्रॅकवर शनिवारी रात्री स्फोट झाला आहे, त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या रेल्वे ट्रॅकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ दिवसापूर्वीच उद्घाटन केले होते. या संदर्भात आता पोलीस आणि अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळाच्या आजुबाजूला खाणकामही सुरू आहे. दोन्ही बाजूंनी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या नवीन मार्गावरील मोठी दुर्घटना टळली. येथील ओढा रेल्वे पुलावरील सालंबर मार्गावर शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. काल रात्री १० वाजता गावकऱ्यांना स्फोटाचा आवाज आला. यानंतर काही तरुण तातडीने ट्रॅकवर पोहोचले. तिथली अवस्था पाहून सगळेच थक्क झाले. रेल्वे रुळावर स्फोटके पडल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे पूल उडवून देण्याचा कट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
केरळच्या इस्लामिक संस्थेत गीता-उपनिषदाचा अभ्यास, विद्यार्थी संस्कृतमध्येच बोलतात
अनेक ठिकाणी रुळ तुटले आहेत. पुलावरील लाइनमधून नट-बोल्टही गायब असल्याचे आढळून आले. रुळावर एक पातळ लोखंडी पत्राही उखडलेला आढळून आला. या घटनेला दुजोरा देताना उदयपूरचे पोलीस अधीक्षक विकास शर्मा म्हणाले की, एफएसएल टीम घटनास्थळी आहे. तपासानंतरच नेमकी स्थिती कळेल. "तपास सुरूच आहे. घटनास्थळाच्या दोन्ही बाजूला गाड्या थांबवण्यात आल्या आहेत, असी माहिती रेल्वे अजमेर विभागाचे जनसंपर्क अधिकारी अशोक चौहान यांनी दिली.
रेल्वेकडून रुळ दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याची माहिती चौहान यांनी दिली. सध्या ट्रेन अहमदाबाद असरवा ट्रेन डुंगरपूर ते असरवा अशीच चालणार आहे. उदयपूर-असरवा ही गाडी रोज संध्याकाळी ५ वाजता सुटते.