निवडणूक आयोग थोड्याच वेळात महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. निवडणुकीचे हे वातावरण केवळ दोन राज्यांपुरतेच मर्यादित राहणार नसून उर्वरित १३ राज्यांतही पोटनिवडणुकीची लागण्याची शक्यता आहे. तसेच ३ लोकसभा मतदारसंघांतही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरात पुन्हा एकदा निवडणुकीचे वातावरण निर्माण होणार आहे.
हरियाणाचा निकाल धक्कादायक लागल्याने महाराष्ट्रातही तसेच होईल या का, याकडे देशभराचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ आणइ झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ ला संपणार आहे. या दोन राज्यांच्या निवडणुकीसोबतच तीन लोकसभा आणि १३ राज्यांच्या ४९ विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.
राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने वायनाडची लोकसभा जागा रिक्त झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्याने ती देखील जागा रिक्त आहे. याचबरोबर पश्चिम बंगालच्या बशीरहाटच्या तृणमूल खासदारांचेही निधन झाले आहे. यामुळे या तिन्ही जागांवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.
कोणकोणती राज्ये...
याचबरोबर १३ राज्यांच्या ४९ विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या १०, राजस्थान ७, पश्चिम बंगाल ६, आसाम ५, बिहार ४, पंजाब ४, कर्नाटक ३, केरळ ३, मध्य प्रदेश २, सिक्किम २, गुजरात १, उत्तराखंड १ आणि छत्तीसगडच्या १ जागांवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे आजच महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. झारखंडमध्ये एका पेक्षा जास्त टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये शक्यतो एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.