नवी दिल्ली : भारतीय सैन्याने आज मोठी कारवाई केली आहे. लडाखच्या पूर्वेकडील देमचोक सेक्टरमधून एका चिनी सैनिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. या चिनी सैनिकाकडे महत्वाचे कागदपत्र सापडले आहेत.
वृत्त संस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी सकाळी चिनी सैनिकाला ताब्यात घेण्यात आले. त्याने चुकून भारतीय हद्दीत प्रवेशे केला, असे सांगण्यात येत आहे. यामुळे प्रोटोकॉलनुसार त्याला पुन्हा चीनच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे.
भारतीय सैन्याकडून सुरु असलेल्या चिनी सैनिकाच्या चौकशीमध्ये तो एकटाच भारतीय हद्दीत कसा घुसला असे विचारले जात आहे. हेरगिरी करण्याच्या इराद्याने त्याने भारतीय हद्दीत प्रवेश केला का? की वाट चुकला याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्य पुढील कारवाई करणार आहे. प्रोटोकॉलनुसार अजानतेपणी सीमा पार केल्यास शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना परत त्यांच्या देशाकडे सोपविले जाते.
दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोरभारत आणि चीनमध्ये मोठा तणाव आहे. यामुळे ही घटना चुकून घडणे तसे अशक्य आहे. देमचोक, पेंगाँग झीलचा उत्तर आणि दक्षिणेकडचा किनारा डोकलाम या भागात तणावाचे वातावरण आहे. डोकलाम वादावेळी हिंसात्मक चकमक झाली होती. यामुळे दोन्ही बाजुच्या सैन्याचा मोठा फौजफाटा एलएसीवर तैनात आहे.
दोन्हा देशांमध्ये सीमेवरून वाद असल्याने नेहमी अशा घटना घडत असतात. मात्र, ते चिनी नागरिक असतात. सैनिक नसतो. भारताने वेळोवेळी चिनी नागरिकांना पुन्हा चीनच्या ताब्यात दिले आहे. या तणाव काळात एक चिनी जोडपे रस्ता चुकले होते. भारतीय सैन्याने त्यांना पाहून आधी विचारपूस केली नंतर त्यांना अन्नपाणी देत चीनच्या सैन्याकडे सोपविले. या काळात भारतीय जवानांनी त्यांची पुरेपूर काळजी घेतली.
प्रोटोकॉल काय सांगतोप्रोटोकॉलनुसार जर कोणी अजानतेपणी सीमापार करून येत असेल तर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जाते. मात्र, चीनचा विश्वासघातकीपणा एवढा वाढलेला आहे की चीनने काहीतरी आगळीक करण्यासाठीदेखील सैनिकाला पाठविण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशच्या पाच तरुणांचे अपहरण केले होते. भारताच्या आरोपांवरही चीन मूग गिळून गप्प होता. मात्र, नंतर काही दिवसांनी चीनने या तरुणांना सोडून दिले.